
सिंधुदुर्गनगरी : सरकारी कामात अडथळा निर्माण करून शासकीय कर्मचाऱ्यांना काम करण्यास प्रतिबंध केल्याप्रकरणी कुडाळ येथील आई-मुलाला न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी प्रतिभा प्रल्हाद गोळवणकर (वय ६९) आणि अमोल प्रल्हाद गोळवणकर (वय ३८, रा. कुडाळ) यांना न्यायालयाने दोषी धरले. न्यायालयाने प्रतिभा गोळवणकर यांना एक वर्ष साधा कारावास व दोन हजार रुपये दंड, तर अमोल गोळवणकर याला एक वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
२ जुलै २०१९ रोजी कुडाळ येथील एस. एन. देसाई चौक परिसरात एमआयडीसीच्या अखत्यारीतील रस्त्यालगत गटार खोदाईचे काम सुरू होते. त्यावेळी प्रतिभा गोळवणकर यांनी थेट गटारात बसून काम थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. तसेच अमोल गोळवणकर याने कामात अडथळा आणत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या घटनेनंतर दोन्ही आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अमोल गोळवणकर याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता.
एमआयडीसीचे तत्कालीन व्यवस्थापक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. तत्कालीन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शीतला पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे दोन्ही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.













