LIVE UPDATES

माणगाव येथे 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' जनजागृती रॅली

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 04, 2026 21:07 PM
views 17  views

कुडाळ : माणगावच्या आठवडा बाजारानिमित्त मंगळवारी "माझे गाव आरोग्य संपन्न गाव" या महत्त्वाकांक्षी शासकीय उपक्रमांतर्गत जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव, उपकेंद्र माणगाव, आयुष्मान आरोग्य मंदिर कालेली आणि ग्रामपंचायत माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली पार पडली.

आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या संकल्पनेतून हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या रॅली व कार्यक्रमादरम्यान मनिषा गिरीश भोसले (सरपंच, माणगाव), डॉ. शिल्पा पाटील (वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र माणगाव),  भिकाजी विष्णु बागवे (उपसरपंच, माणगाव), एस. एल. असवले (आरोग्य सहाय्यक), सुहास गावडे (आरोग्य निरीक्षक), नलिनी ठाकूर (आरोग्य सहाय्यीका), नेहा अनावकर (आरोग्य सहाय्यीका), चेतना भरत महाडगुद (ग्राम विकास अधिकारी), अनिश सावंत (आरोग्य सेवक), एस. एस. सातार्डेकर (आरोग्य सेविका), दिप्ती सुभाष गोडे (आरोग्य सेविका) आदी मान्यवर उपस्थित होते.

आठवडा बाजारानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये टीबी, डेंग्यू, मलेरिया, उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) आणि कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात आली. तसेच, आधुनिक टेलिमेडिसिन सेवा आणि शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. या अभियानांतर्गत गाव पातळी, पंचायत समिती स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि राज्य स्तर अशा विविध स्तरांवर भरघोस पारितोषिके दिली जाणार असल्याने गावोगाव स्पर्धात्मक वातावरण तयार झाले आहे. तसेच, या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. आठवडा बाजार सुरू असताना झालेल्या या रॅलीला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.