LIVE UPDATES

बंद घर फोडून पाच लाखांचे मंगळसूत्र लंपास

कालवे काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरावर चोरट्याचा डल्ला
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 04, 2026 20:13 PM
views 44  views

देवगड : देवगड तालुक्यातील वाडातर खाडी येथे कालवे व मूळे काढण्यासाठी गेलेल्या वाडातर येथील प्रतिभा प्रदीप चोपडेकर (वय ६८) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने डल्ला मारून कपाटातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १ जून रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चोपडेकर या १ जून रोजी पहाटे वाडातर खाडी येथे कालवे व मूळे काढण्यासाठी गेल्या होत्या. घराबाहेर पडताना त्यांनी राहत्या घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून त्याची चावी नेहमीप्रमाणे ठरावीक ठिकाणी ठेवली होती. काही वेळाने त्या घरी परतल्यानंतर त्यांनी त्याच चावीने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला.

घरात प्रवेश करताच त्यांना बेडरूममधील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याने त्यांनी पाहणी केली असता कपाटामध्ये ठेवलेले काळे मणी व पेंडल असलेले पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या मंगळसूत्राची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रतिभा चोपडेकर यांनी गुरुवारी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३) व ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तपासाबाबत देवगड पोलिसांना आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक शाम बुवा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार, हवालदार आशिष कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या चोरी प्रकरणाचा पुढील तपास हवालदार आशिष कदम करीत आहेत.