
- थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश
- कोकण विभागीय मंडळाची कडक भूमिका
सिंधुदुर्गनगरी : आपल्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत अधिक गुण मिळावेत या लालसेपोटी पालकाने (जे स्वतः मुख्याध्यापक आहेत) घडवून आणलेला गैरप्रकार तब्बल २४ जणांच्या करिअरला ग्रहण लावणारा ठरला आहे. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील 'आदर्श विद्यामंदिर' केंद्रावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारात, एका विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यासाठी परीक्षा केंद्रावरील यंत्रणेचाच गैरवापर करण्यात आला. या प्रकरणी कोंकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
एकाच विद्यार्थ्यासाठी संपूर्ण यंत्रणा पणाला
चौकशीअंती एक महत्त्वाची बाब स्पष्ट झाली आहे की, या केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार घडलेला नाही. मात्र, एकाच विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या पाच विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार करण्यासाठी केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक आणि स्टेशनरी सुपरवायझर अशा सर्वांनाच या गैरप्रकारात ओढण्यात आले. आपल्या पाल्याला अधिक गुण मिळवून देण्याच्या हव्यासामुळे पालकाने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान तर केलेच, पण सोबतच कर्तव्यदक्ष शिक्षकांनाही अडचणीत आणले. एकाच विद्यार्थ्याच्या प्रकरणात २४ जणांवर कारवाई प्रस्तावित होण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा.
मुख्य सूत्रधार आणि गुन्हेगारी कारवाई
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हे संबंधित विद्यार्थ्याचे पालक संजय कणिराम राठोड आहेत, जे स्वतः एक मुख्याध्यापक आहेत. त्यांच्यासोबतच शिक्षक संजय कुमार खेमा आडे यांचा या प्रकरणात तितकाच मोठा सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या दोघांसह उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहिणारी अज्ञात व्यक्ती अशा तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोंकण विभागीय मंडळाने दिले आहेत. यासाठी सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने एफआयआर (FIR) नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परीक्षा कालावधीत पेपर दिवशी संबंधित विद्यार्थ्यांचे पालक श्री राठोड आणि रिलीव्हर पर्यवेक्षक श्री आडे हे परीक्षार्थीच्या वर्गाबाहेरून अज्ञात व्यक्तीच्या हस्ताक्षरातील उत्तरे लिहिलेल्या पुरवण्या वर्गावरील पर्यवेक्षकांकडे देऊन त्या मुख्य उत्तरपत्रिकेस जोडण्यास सांगत असत. त्यास काही पर्यवेक्षकांनी विरोधही केला. मात्र मूल्यमापन प्रक्रियेत असलेल्या दोन विषयांच्या परीक्षक व नियमकांनी मंडळास मुख्य उत्तरपत्रिका व पुरवण्यांवरील उत्तरे यातील हस्ताक्षरात तफावत असल्याबाबत अहवाल पाठवला. या अहवालामुळे हे प्रकरण उघडकिस आले. मात्र इतर विषयांच्या परीक्षकांनी ही बाब दुर्लक्षित केली. विशेष म्हणजे वर्गात परीक्षार्थी याने काही प्रश्नांची उत्तरे स्वतः मुख्य उत्तरपत्रिकेत लिहिली तरीही अज्ञात व्यक्तीकडून बाहेरून लिहून आणलेल्या पुरवण्यांमध्येही वेगळ्या हस्तक्षरात त्याच प्रश्नांसह इतर प्रश्नांची उत्तरे आढळून आली.
या प्रकरणात विभागीय मंडळात 27 एप्रिल रोजी संबंधितांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्या आधारे मंडळांनी परीक्षार्थीच्या पाच विषयाची संपादनूक रद्द केली. केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकार घडला आहे किंवा कसे? तसेच यात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे, यासाठी मंडळाने चौकशी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक सिंधुदुर्ग यांना केंद्रावर भेट देऊन चौकशी करण्यास निर्देश दिले. त्यानुसार चौकशी अधिकारी यांनी 22 मे रोजी परीक्षा केंद्रास भेट देऊन चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
दोषींची यादी आणि कारवाई
या गैरप्रकरणात एकूण २५ जणांची चौकशी करण्यात आली होती. यापैकी शिपाई अक्षय विलास मोरे यांचा या गैरप्रकारात कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यांना केवळ लेखी समज देण्यात येणार आहे. उर्वरित २४ जणांवर खालीलप्रमाणे कारवाई कोकण विभागीय मंडळाच्या तदर्थ समितीने निश्चित केली आहे-
विद्यार्थी:याची पाच विषयांची संपादणूक (निकाल) मंडळाने रद्द केली आहे.
परीक्षा केंद्राशी संबंधित (सिंधुदुर्ग जिल्हा): केंद्रसंचालक श्री. अविनाश शामराव कांबळे, उपकेंद्रसंचालक श्री. नरेंद्र रामचंद्र साबळे, स्टेशनरी पर्यवेक्षक श्री. नितिन सिताराम जाधव, पर्यवेक्षक श्री. प्रफुल्ल धोंडीराम कांबळे, श्री. सुप्रसाद सहदेव पांचाळ, श्री. प्रविण बंडोपंत पोतदार, श्री. विशाल गोविंद पाटील, श्री. मिलिंद रामराव शेंडगे, श्री. जयवंत केशव पाटील, श्री. संदीप महिपती लाड, आणि रिलिव्हर पर्यवेक्षक श्री. संजयकुमार खेमा आडे यांचे परीक्षा मानधन जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर एमईपीएस (MEPS) नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १० परीक्षक व नियामक(मुख्य उत्तर पत्रिका व पुरवण्यांमध्ये हस्ताक्षरात असलेला बदल दुर्लक्षित केलेले):परीक्षक श्री. कांबळे अरुण सदाशिव, श्रीम. बिवलकर वैदही श्रीराम, श्रीम. शिंदे स्वप्नाली विशाल, श्री. आंबवडे प्रशांत मच्छिंद्र, श्री. रेमणे रंजन माधव आणि नियामक श्रीम. जोशी रमा हेमंत, श्रीम. सुप्रिया शरद गार्डी, श्री. सरदेसाई विनोद वामन, श्री. मुजावर उमरफारुक बाबू, श्री. केसरकर सुनिल रघुनाथ यांचेही मानधन जप्त करून त्यांच्यावर एमईपीएस (MEPS) नुसार कारवाई करण्याचे संस्थेस आदेश देण्यात आले आहेत.
संस्था प्रमुखांना इशारा
एमईपीएस (MEPS) नियमावलीनुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण संस्थांना आहेत. मात्र, मंडळाने प्रस्तावित केलेल्या शिक्षेची अंमलबजावणी न केल्यास, संबंधित शिक्षण संस्था प्रमुखांविरुद्धही कठोर भूमिका घेतली जाईल, असे संकेत अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत.
अद्याप अनुत्तरित प्रश्न
या गैरप्रकाराचे अनेक पैलू अजूनही गूढ आहेत. प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न नेमके कोणी व कुठून मिळवले? ज्यादा लिहिलेल्या उत्तरपत्रिकांवर नेमके कोणाचे हस्ताक्षर आहे? तसेच हा प्रकार केंद्रात घडला की केंद्राबाहेर पुरवण्या लिहून त्या नंतर केंद्रात आणल्या गेल्या? या प्रश्नांचा उलगडा आता पोलीस तपासातूनच होणार आहे.














