LIVE UPDATES

आंबोली जंगलात शिकाऱ्यांचा सुळसुळाट ?

8 जणांना बेड्या, दोघे फरार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 19:59 PM
views 265  views

सावंतवाडी : आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रात बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. एका कारवाईत चौकुळ येथील एक जण तर दुसऱ्या कारवाईमध्ये कोल्हापुरातील सात जणांवर अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तर कोल्हापूर परिसरातील आणखी दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध वनविभाग घेत आहे. या कारवाईत आरोपींकडून जिवंत व मृत वन्यजीव, शिकारीचे साहित्य आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.

पहिली कारवाई बुधवारी रात्री सावंतवाडी दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्र मौजे मासुरे येथे करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विनापरवाना ठासणीच्या बंदुकीने वन्यजीव साळिंदरची शिकार करून घेऊन जात असताना विठू वाघु कोकरे (वय ४५, रा. चुरणीचीमुस चौकुळ, ता. सावंतवाडी) याला वनविभागाच्या पथकाने सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून साळिंदर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या कारवाईत बुधवारी रात्रीनंतर पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई नेने राखीव वनक्षेत्रातील शिरगांवकर पॉईंट येथे करण्यात आली. येथे संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तीन इसमांचा पाठलाग करून चौकशी केली असता, त्यांच्याकडे मृत वन्यप्राणी पिसोरी आणि कटींदर आढळून आला. त्याच दरम्यान घटनास्थळावरून त्यांच्या इतर चार साथीदारांना एमएच ०९ जीएफ ००१४ या चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले. मात्र, अन्य दोन साथीदार घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध वनविभागाच्या पथकाकडून सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या मध्ये पवन प्रकाश देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), जावेद सलीम जमादार (रा. यादव नगर मेन रोड, कोल्हापूर), हसीम हुसेन काजी (रा. तिरवडे कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), भरत नवलू पाटील (रा. चौकुळ, जळववाडी नेने, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), वनु विठ्ठल फोंडे (रा. एरंडपे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), गणेश तुकाराम पाटकर (रा. पिंपरी चिंचवड, नवी सांगवी, पुणे) आणि आकाश मोहन कुरणे (रा. यादव नगर, कोल्हापूर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करून गुरुवारी सावंतवाडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानुसार न्यायालयाकडून संबंधितांना अधिक तपासाकरती वनकोठडी सुनावण्यात आली.

ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक वैभव सा. बोराटे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल वैभव भिसे, वनपाल नामदेव चौगुले, मैबुब नायकवडे, सम्राट पाटील, गोरीश राणे, रविंद्र पाटील, संग्राम पाटील, तानाजी चव्हाण, वासुदेव खोत, अनिकेत आवारे, अनिकेत देशमुख व आर.आर.टी. टीमने विशेष परिश्रम घेऊन केली आहे. आंबोली हे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र असल्याने नागरिकांनी शिकार करणाऱ्यांची माहिती वनविभागाला द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.