
जिल्हाध्यक्ष अमित सामंतांचा आंदोलनाचा इशारा
कुडाळ :वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव, धाकोरे, आरवली, सोन्सुरे, मळेवाड, सखेखोल आणि आसोली या सात गावच्या ग्रामस्थांनी ग्रामसभांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून या परिसरातील मायनिंगला तीव्र विरोध केला आहे. असे असतानाही प्रशासनाने ग्रामसभेच्या अधिकारांवर गदा आणत 'जेएसडब्ल्यू' (JSW) कंपनीला परवानगी दिली. "हा निर्णय नेमका कोणाच्या राजकीय दबावाखाली घेण्यात आला? यात सामील असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)गट चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे.
आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा देत अमित सामंत यांनी सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनावर कडक शब्दांत घणाघात केला.
अमित सामंत म्हणाले की, भारतीय संविधानाने ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांना सर्वोच्च अधिकार दिले आहेत. जर स्थानिक ग्रामस्थांच्या निर्णय प्रक्रियेला आणि त्यांच्या विरोधाला प्रशासना कडून किंमतच दिली जाणार नसेल, तर शासन स्तरावरून ग्रामसभांचे स्तोम का माजवले जाते? प्रशासनाने ग्रामसभा बंदच करून टाकाव्यात.
"सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून अशा वादग्रस्त प्रकल्पांना खतपाणी घातले जात आहे. जिल्ह्याबाहेरील धनदांडग्यांना आणून स्थानिक ग्रामस्थांमध्ये संघर्ष आणि अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. आपले स्वार्थ साध्य करू पाहणाऱ्या या प्रवृत्तींना स्थानिक ग्रामस्थ यापुढे धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत."
— अमित सामंत (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस - शप)
जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने ड्रोन सर्वेक्षण करताना परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांची नावे घेतली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने मायनिंगबाबत आपली भूमिका आधी स्पष्ट करावी, असे आवाहन सामंत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक विनाशकारी प्रकल्प आणून स्वतःचे स्वार्थ साधण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले असून भविष्यातही होतील. त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेने आताच योग्य वेळी यांना धडा शिकवण्याची गरज आहे, तरच जिल्ह्यात प्रदूषित आणि धोकादायक प्रकल्प आणण्याचे धाडस कोणी करणार नाही, असे ते म्हणाले.
मायनिंग सर्वेक्षणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या निष्पाप ग्रामस्थांवर जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे दाखल झालेले गुन्हे तातडीने आणि विनाशर्त मागे घेण्यात यावेत, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख मागणी आहे. जर प्रशासनाने हे गुन्हे लवकर मागे घेतले नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा गर्भित इशारा अमित सामंत यांनी दिला.
"आताचे सत्ताधारी जिल्ह्याबाहेरील लोकांना खतपाणी घालून स्थानिकांवर गुन्हे कसे दाखल होतील, याचीच वाट पाहत असतात. सत्ताधाऱ्यांना फक्त पाच वर्षांतून एकदा मतांसाठीच जनतेची गरज भासते. त्यामुळे ग्रामस्थांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही अशा शांततेच्या आणि न्याय्य मार्गाने या प्रकल्पाला विरोध करावा. या संघर्षात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आजगाव दशक्रोशीतील तमाम ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे," अशी ग्वाही शेवटी सामंत यांनी दिली.










