LIVE UPDATES

सातार्डा येथील तरुणाची फसवणूक

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 20:43 PM
views 65  views

सावंतवाडी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातार्डा परिसरातील एका युवकाला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हॉईस कॉल करून ब्लॅकमेल करत ७८ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने पावले उचलत या रक्कमेपैकी ४३ हजार रुपयांचा व्यवहार होल्ड करण्यात यश मिळवले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातार्डा येथील एका तरुणाच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. "एका मुलीने तुला कॉल केला होता, तिच्याकडे तुझा व्हिडिओ आहे आणि ती तो सोशल मीडियावर अपलोड करणार आहे. यामुळे तुझ्या कुटुंबाला अटक होईल," अशी खोटी भीती संबंधित अज्ञात व्यक्तीने तरुणाला दाखवली. या धमकीला घाबरून तरुणाने वेळोवेळी करून मागितलेली सुमारे ७८ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने अज्ञात व्यक्तीला पाठवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांत धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करत आहेत.

मी पोलीस, जज, सीबीआय किंवा सीआयडी अधिकारी बोलत आहे, असे सांगून जर कोणी फोन किंवा मेसेजद्वारे धमकी देत असेल, तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. अशा धमक्यांना घाबरून कोणालाही पैसे पाठवू नका. अशी कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.