
आंतरजिल्हा बदल्यांना समितीचा कडाडून विरोध
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना आंतरजिल्हा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागी पर्यायी कर्मचारी रुजू होईपर्यंत जिल्ह्याबाहेर कार्यमुक्त करू नये, असा ठाम निर्णय जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना स्पष्ट सूचना दिल्या.
येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरोग्य समितीची मासिक सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्य रुपेश पावसकर, सुनील पारकर, अवनी तेली, यज्ञा साळगावकर, श्वेता धरणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा चर्चेत आला. हिवताप विभागातील तीन आरोग्य सेवकांची कोल्हापूर, पुणे व सातारा येथे बदली झाल्याची माहिती देण्यात आली. त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत विचारणा होताच समिती सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. जिल्ह्यात आधीच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांची अनेक पदे रिक्त असल्याने पर्यायी कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत कोणालाही जिल्ह्याबाहेर सोडू नये, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याही आंतरजिल्हा बदल्या झाल्याची माहिती डॉ. सई धुरी यांनी दिली. यापैकी एका अधिकाऱ्याने गडचिरोली येथून पदोन्नती घेऊन सिंधुदुर्गात रुजू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा विनंती बदलीचा प्रस्ताव दिल्याची बाब समोर आली. यावर सभापती प्रितेश राऊळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "प्रमोशनसाठी सिंधुदुर्गचा आधार घ्यायचा आणि गरज संपताच बदली करून घ्यायची, ही भूमिका योग्य नाही," असे स्पष्ट करत रिक्त जागांचा विचार करून कोणालाही कार्यमुक्त करू नये, असे निर्देश दिले.
बैठकीत शिवापूर येथे झालेल्या अतिसाराच्या साथीचाही आढावा घेण्यात आला. या साथीमध्ये ८० नागरिक बाधित झाले होते. मात्र आरोग्य विभागाच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली.
हिवताप विभागाने जिल्ह्यात कामासाठी आलेल्या ६ हजार ५५५ परजिल्ह्यातील मजुरांची हत्तीरोगासाठी तपासणी केली. त्यामध्ये १२५ मजुरांमध्ये हत्तीरोगाचे जंतू आढळून आले होते. संबंधित सर्वांवर औषधोपचार करण्यात आले असून ते पूर्णपणे बरे झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
आशा स्वयंसेविकांचे मानधन वाढविण्याची मागणी
आशा स्वयंसेविका अत्यंत प्रामाणिकपणे आरोग्य सेवा बजावत असून अत्यल्प मानधनावर घरोघरी जाऊन रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवकांप्रमाणे त्यांचेही मानधन वाढवावे, अशी मागणी सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्याकडे केली.










