
सावंतवाडी : सिंधुदुर्ग पोलिसांच्यावतीने अवैध धंद्यांविरोधात राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत आज २ जुलै २०२६ रोजी दुपारच्या सुमारास बांदा चेकपोस्ट येथे मोठी कारवाई करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान एका बोलेरो पिकअप जीपमधून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी तब्बल ४ लाख ४७ हजार २४० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दुपारी बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांचे नाका तपासणीचे काम सुरू होते. यावेळी तेथून जाणाऱ्या MH 07 AJ 5209 या क्रमांकाच्या बोलेरो पिकअप जीपला पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले. गाडीची कसून झडती घेतली असता पोलिसांना त्यामध्ये विविध नामांकित ब्रँडची गोवा बनावटीची दारू लपवून ठेवली असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमोल लक्ष्मण चिंदरकर (वय ३५, रा. कलमठ, तालुका कणकवली) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईत ४,४७,२४०/- रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू, ५,००,०००/- रुपये किमतीची बोलेरो पिकअप जीप असा एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भातील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहेपर्यंत सुरू होती. ही धडक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पालकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. परब यांनी केली. तसेच या कारवाईत हेड कॉन्स्टेबल दादा परब, राजेश गवस व राकेश चव्हाण यांनी मोलाची मदत केली.













