
सिंधुदुर्गनगरी : वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव तेली याला विशेष न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणावर विशेष न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. संशयिताच्या वतीने ॲड. संग्राम देसाई, ॲड. सुहास साटम व ॲड. जान्हवी दुधवडकर यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.
सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस निरीक्षक दिपक माळी यांनी दिलेल्या माहिती नुसार , ४९ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या बिलाची फाईल मंजुरीसाठी सादर केली होती. मात्र, या बिलात त्रुटी असल्याचे सांगून कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली यांनी काम पूर्ण करून देण्यासाठी बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के म्हणजेच १८,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १०,००० रुपये ठरवण्यात आली.
तक्रारदाराने या संदर्भात कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, ४ मे २०२६ रोजी जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षकांच्या कक्षातच एसीबीने दोन वेळा सापळा रचला. मात्र सापळा रचल्याची कूण कूण लागल्याने रक्कम स्वीकारली नाही. अखेर मंगळवार दिनांक १२ मे रोजी लाच मागणी केल्याच्या तक्रारीवरून तेली यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले होते.














