
सावंतवाडी : बांदा येथील पोलिस तपासणी नाक्यावर पोलिसांनी गोवा बनावटीच्या विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारी मोटार पकडली. यामध्ये सुमारे ४ लाख ८ हजार रुपयांची दारू व ७ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी प्रशांत रवींद्र जाधव (३३, रा. राजापूर बौद्धवाडी, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास बांदा चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या (एमएच ४३ एन २३३९) या क्रमांकाच्या मोटारीला थांबवून पोलिसांनी झडती घेतली.गाडीमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सच्या गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत विविध नामांकित कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या, मोटार असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी पोलिसांनी रत्नागिरी येथील प्रशांत जाधव या संशयिताला ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दासू पवार, पोलिस कर्मचारी प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील, नेल्सन फर्नांडिस आणि प्रशांत बोठे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.












