
सावंतवाडी : बांदा पोलिस चेकपोस्ट येथे बांदा पोलिसांनी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. ट्रकमधून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयाची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत दारूसाठा आणि ट्रक असा एकूण १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भारत संदीपान जाधव (वय ३१, सध्या रा. वाघोली, पुणे शहर; मूळ रा. मौजवाडी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास बांदा चेक नाका येथे पोलिसांनी संशयास्पद ट्रकला (MH 27 BX 9099) अडवले. या ट्रकची कसून झडती घेतली असता पोलिसांना आतमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याचे आढळून आले. या कारवाईत १ कोटी २१ लाख ६० हजार ७१६ रुपयांची दारू व सुमारे १५ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हेड कॉन्स्टेबल विलास भोगले, एच.सी. तेली, पोलीस कॉन्स्टेबल सुशांत हिर्लेकर, पी.सी. बर्गे यांनी थेट सहभाग घेतला. तसेच या कारवाईत हेड कॉन्स्टेबल मालकर, राजेश गवस, दादा परब, पी.सी. राजाराम कापसे, प्रसाद पाटील आणि रोहित कांबळे यांनी मदत केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे करत आहेत. सीमाभागात झालेल्या मोठ्या कारवाईमुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.














