LIVE UPDATES

वेंगुर्लेत एलसीबीची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई

सुमारे ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त
Edited by: दिपेश परब
Published on: June 22, 2026 16:46 PM
views 31  views

वेंगुर्ला :  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी रविवारी रात्री ११ वाजता वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक करणाऱ्या वर कारवाई केली आहे. या कारवाईत २४ हजार २०० रुपयांचा अवैध गुटखा, तंबाखुजन्य व ५५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा मिळून ७९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

रविवार (२१ जून) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एलसीबीच्या पथकाने वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत आरोंदा ते रेडी मार्गावर हुडावाडा येथे ही कारवाई केली. या कारवाईत आरोंदा येथील मनोज मोहन खोबरेकर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३,३(५), अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर यांनी केली.