
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे तळवणे येथे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे पार पडणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक आणि तळवणे ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद केरकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे. स्थानिक रोजगार निर्मिती, बंदर विकास आणि जहाज बांधणी क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असे आयोजकांनी सांगितले.










