
दोडामार्ग : तब्बल 11 वर्षानी झालेल्या दोडामार्गच्या आमसभेत सत्ताधारी व विरोधकांत राडा झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याची आमसभा चांगलीच तापली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेली आमसभा जनतेच्या प्रश्नांवर ठोस चर्चा करण्याऐवजी राजकीय संघर्षामुळे अधिक चर्चेत आली. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा सुरू असताना स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित करताक्षणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी रविकिरण गवस यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधितांना रोखले. अन्यथा, सभागृहात मोठा राडा झाला असता.
दोडामार्गमधील रखडलेली विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि मूलभूत सुविधांबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच सभागृहातील वातावरण तापत गेले. अखेर या वादाचे पडसाद थेट कार्यकर्त्यांमध्ये उमटले. दोडामार्गची जनता अनेक वर्षांपासून आमसभेची वाट पाहत होती. जनतेला अपेक्षा होती की आमसभेत स्थानिक प्रश्न मांडले जातील, विकासकामांचा आढावा घेतला जाईल, प्रशासनाकडून उत्तरं मिळतील आणि प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय होतील. मात्र, आमसभा सुरू होताच विकासाच्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले. विरोधकांनी स्थानिक प्रश्नांवरून आमदार दीपक केसरकर यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. याचदरम्यान सभागृहातील वातावरण चिघळत असल्याचे पाहून आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले “ज्यांना सभागृहात बसायचे नसेल त्यांनी बाहेर जावे, कोणीही सभेला डिस्टर्ब करू नये.” मात्र, या इशाऱ्यानंतरही वातावरण शांत झाले नाही. उलट सभागृहातील तणाव आणखी वाढला. यात शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी रवीकिरण गवस यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना मारहाण केली. यावेळी शिवसेनेचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ही एकमेकांच्या दिशेने धावून गेल्याने काहीकाळ सभागृहात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. ज्या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित होती, त्याच सभागृहात राजकीय संघर्षाचा आवाज घुमल्याने या संपूर्ण प्रकाराची चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली आहे. त्यामुळे आता सवाल असा आहे की, अनेक वर्षांनंतर झालेली ही आमसभा नेमकी जनतेच्या प्रश्नांसाठी होती की राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी? दोडामार्गच्या जनतेचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असतील, तर त्यावर चर्चा आणि उत्तरांची गरज आहे सभागृहातील गोंधळाची नाही.
दरम्यान, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उत्तरं मिळाली का? विकासकामांबाबत नेमकी काय माहिती देण्यात आली? आणि प्रश्न उपस्थित होत असताना वातावरण इतके का तापले? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे आमसभा ही लोकशाहीचे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. जनतेच्या समस्या मांडणे, प्रशासनाला जाब विचारणे आणि विकासाचा आढावा घेणे हा आमसभेचा मुख्य उद्देश असतो. मात्र, दोडामार्गमध्ये या आमसभेचे राजकीय संघर्षात रूपांतर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकीकडे, विरोधकांचा आक्रमक पवित्रा, दुसरीकडे सत्ताधारी समर्थकांची प्रतिक्रिया आणि त्यातून निर्माण झालेला तणाव यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ पूर्णपणे बदलून गेले.आता या संपूर्ण घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सभागृहात शिस्त राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची वेळ का आली? आमसभेत उपस्थित केलेल्या स्थानिक प्रश्नांवर ठोस निर्णय झाले का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोडामार्गच्या जनतेच्या मूळ प्रश्नांचे पुढे काय?कारण, गोंधळ थांबेल, राजकीय वाद शांत होईल, कार्यकर्ते सभागृहाबाहेर जातील. पण, दोडामार्गच्या जनतेचे प्रश्न मात्र तिथेच राहणार आहेत. रस्ते, मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक समस्या यावर आता ठोस कृती होणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
दोडामार्गमुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले...
दोडामार्गच्या आमसभेने पुन्हा एकदा तालुक्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. अनेक वर्षांनी झालेली आमसभा, विकासाच्या प्रश्नांवरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा, आमदार दीपक केसरकर यांचा सभागृहातील इशारा आणि त्यानंतर शिवसेना व ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला संघर्ष या संपूर्ण प्रकारामुळे दोडामार्गच्या राजकारणात पुढील काळात आणखी पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मात्र, आता जनतेला राजकीय राडा नकोय. जनतेला हवी आहेत प्रश्नांची उत्तरं आणि विकासकामांची ठोस अंमलबजावणी. आमसभा संपली असली तरी दोडामार्गच्या जनतेचे प्रश्न संपलेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सभा चिघळण्याचा प्रयत्न विरोधकांचा होता : गणेशप्रसाद गवस
दरम्यान, गेली 11 वर्षे रखडलेली आमसभा आम्ही आमच्या सभापती उपसभापती सर्व मंडळ बसल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात आमसभा लावली आणि सुरवातीलाच काही विरोधक मुद्दामहुन सभा चिघळावी यासाठी प्रयत्न करत होते. रविकिरण गवस जो प्रश्न उपस्थित करत होता की गटविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई चालू असताना त्या अधिकाऱ्याला व्यासपीठावर कसे बसविले ? असा प्रश्न होता. या प्रश्नाचा त्याला या अगोदर ही उत्तर दिल होत. मात्र, तो मुद्दामहुन परत परत प्रश्न उपस्थित करत होता. म्हणून कार्यकर्ते संतापले आणि त्याचाकडून माईक काढून घेतला त्याला कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही.
तो ऐकत नव्हता म्हणून कार्यकर्त्यांचा संताप वाढला, मी दिलगिरी व्यक्त करतो : आमदार केसरकर
सभेचा अध्यक्ष म्हणून मी त्याला वारंवार सांगत होतो की खाली बसा, तरी देखील ते ऐकत नव्हते. म्हणून त्यावेळी कार्यकर्तेही संतापले आणि थोडासा गदारोळ निर्माण झाला. तरी मी सर्वांची दिलगीर व्यक्त करतो असे आमदार केसकर म्हणाले. बाकीचे 5/6 तासही सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. जर त्यांना मारहाण झाली असती तर त्यांनी त्याचवेळी सभेचा निषेध करत सभा सोडून बाहेर पडायला पाहिजे होत. मात्र, तस न करता ते थांबले आणि त्या नंतर त्याला 4 वेळा बोलण्याची संधी दिली. गवस यांना सभा शास्त्राचा अर्थ माहित नाही म्हणून असा प्रकार घडला.
विरोधकांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकाराचा निषेध
ठाकरे सेना तालुका प्रमुख संजय गवस व रविकिरण गवस बोलताना म्हणाले की, काही प्रश्न उपस्थित कराता क्षणी आमदार केसरकर यांनी दोडामार्गत पाळलेली मंडळी ही त्यांनी आज दाखवू दिली आहेत. कारण, एक प्रश्न उपस्थित करताक्षणी अंगावर धावून येऊन मारहाण करणे हे कितपत योग्य आहे. ही हुकूमशाही आहे लोकशाही नाही. या संदर्भात मी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेणार आहे असे रविकिरण गवस म्हणाले. तसेच संजय गवस म्हणाले की, आमदार दीपक केसरकरांनी अशा कार्यकर्त्यांना आवर घाटला पाहिजे. सत्तेचा माज होता नये याचा आम्ही सर्वजण विरोधी पक्ष म्हणून निषेध करतो.
वीज समस्येवर बोलताना जि. प .माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी आक्रमक झाले. सासोली सब स्टेशन मध्ये असलेला अधिकारी कधीही सबस्टेशनला नसतात. फोन केल्यावर उचलत नाहीत.त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करा. तसेच दोडामार्ग मधील काही अधिकारी गोव्याच्या हद्दी त दारू पिताना दिसतात अशा अधिकाऱ्यांना येथून बदली करा अशी आक्रमक भूमिका नाडकर्णी यांनी मांडली.तसेच भाजप माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी तर वनविभाग चे कर्मचारी नुकसान भरपाईचे पंचनामे करताना थेट शेतकऱ्यांकडे पैसे मागतात असा गंभीर आरोप दळवी यांनी वनविभागावर केला.










