LIVE UPDATES

काश्मीर कनेक्शनने सावंतवाडीत खळबळ

मुस्लिम वेशातील तिघे ताब्यात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 24, 2026 17:31 PM
views 728  views

  • पोलिसांच्या तपासानंतर परतीची कारवाई
  • हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने प्रकार उघड

सावंतवाडी : शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन संशयित काश्मिरी नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना परत पाठवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, यावरून हिंदूत्वादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक सवाल उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे.

     

भटवाडी काजरकोंड परिसरातील एका घरात मुस्लिम वेश परिधान केलेल्या दोन पुरुष आणि एक युवती अशा तीन व्यक्तींनी प्रवेश केला. मदतीसाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांच्या वागण्याबोलण्याचा संशय आल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हे तिघेही स्थानिक नसल्याचे आणि त्यांची हिंदी भाषाही वेगळी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांना पाचारण केले. यानंतर सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. प्राथमिक चौकशीत हे नागरिक जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा गावचे असल्याचे निष्पन्न झाले. सावंतवाडी पोलिसांनी अधिकृत पडताळणीसाठी थेट जम्मू-काश्मीरमधील संबंधित पोलिस ठाणे, बीट अंमलदार आणि सरपंचांशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर हे नागरिक फिरस्ते असल्याची नोंद करून त्यांना परत पाठवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अशा संशयित लोकांपासून नागरिकांनी सावध राहावे, संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी या नागरिकांची ओळख पटल्याचे सांगितले असले, तरी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समाधान झालेले नाही. काश्मीरमधून एवढ्या लांब हे लोक सावंतवाडीत का आले ? ते कोणाच्या आश्रयाने थांबले ? त्यांच्याकडे असलेली ओळखपत्रे व कागदपत्रे खरी की बनावट ? त्यांना येथे नेमके कोणी आणले, त्यामागील उद्देश काय? असे अनेक सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेत. या सर्व प्रकाराबाबत आपण वरिष्ठांना सविस्तर माहिती देणार असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.