
कणकवली : केंद्र सरकारच्या विविध शासकीय विभागांमध्ये उच्च पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित तरुणांच्या पालकांची तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या नोकरी घोटाळा प्रकरणात कणकवली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील दुसरी मुख्य संशयित आरोपी विनिता विवेक मुंज (५०, रा. पटकी देवी मंदिराजवळ, कणकवली) हिने शुक्रवारी कणकवली पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात तक्रारदार सुनील दामोदर धुरे यांच्यासह अन्य पालकांची पाच मुलांना शासकीय नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एकूण १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. यापूर्वी या गुन्ह्यातील मुख्य संशयित मनोज जैन याला पुण्यातील येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित सुबत्ता माळी आणि विनिता मुंज यांनी अटकेपासून बचाव करण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले. त्यानंतर विनिता मुंज हिने शुक्रवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तिला रीतसर अटक केली.
या घोटाळ्याचा तपास सुरू असताना आणखी चार नवीन व्यक्तींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संशयितांची संख्या सातवर पोहोचली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील करीत आहेत.










