
देवगड : जामसंडे-शिळोम येथील रहिवासी प्रसाद गोपाळ मोंडकर यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील सर्व नळ कापून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील अन्य वस्तू किंवा मालमत्तेची चोरी झाली आहे का, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मोंडकर कुटुंबीय सध्या पुणे येथे असल्याने चोरीचा नेमका तपशील आणि नुकसानीचा अंदाज स्पष्ट झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मोंडकर यांच्या घरातील लोखंडी सिक्युरिटी डोअर आणि मुख्य दरवाजा बंद होते. मात्र, दोन्ही दरवाजांची कुलपे काढून ठेवण्यात आली होती. घराकडे नेहमी येणाऱ्या कामगाराच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याने मोंडकर कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित कामगार आणि शेजाऱ्यांनी घराची पाहणी केली.
यावेळी घराच्या मागील बाजूला दरवाजाला कुलूप लावण्यासाठी असलेला भाग कापल्याचे दिसून आले. मागील बाजूचे दरवाजे उघडे असून केवळ ओढून लावण्यात आल्याचे आढळले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, संपूर्ण घरातील नळ कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
घरातील अन्य वस्तूंची चोरी झाली आहे का, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. प्रसाद मोंडकर गावी परतल्यानंतर चोरीचा नेमका तपशील आणि झालेल्या नुकसानीचा अंदाज स्पष्ट होणार आहे.










