LIVE UPDATES

वृद्धेच्या गळ्यातील चैन चोरट्यांकडून लंपास

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 08, 2026 22:02 PM
views 18  views

कणकवली : वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात भामट्यांनी लंपास केल्याची घटना कणकवली येथे घडली आहे.त्या वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन  अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावती भाईनाथ रजपूत (वय ७०, रा. कलमठ, गोसावीवाडी) यांचे कणकवली बसस्थानकापासून जवळच एसटी कॉलनी नजीक महामार्ग सर्व्हिस रोड येथे छोटे दुकान आहे. या दुकानात दोन अज्ञात व्यक्ती कमरेचा बेल्ट खरेदी करण्यासाठी सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आल्या होत्या. त्यातील एका व्यक्तीने २०० रुपयांचा बेल्ट खरेदी केला. तसेच त्यातील एका व्यक्तीने या परिसरात देवीचे मंदिर कोठे आहे, अशी चौकशी राजपूत यांच्याकडे केली. तसेच मंदिरात देणगी द्यायची असल्याचे सांगून त्यांनी आपल्या जवळील तीन हजार रुपये एका कागदावर ठेवले.तसेच मंदिरात ते पैसे देणगी म्हणून द्यायचे असल्याचे सांगितले.

यानंतर त्यांनी रजपूत यांना, तुमच्या गळ्यातील सोन्याची चेनही या कागदावर ठेवा, त्यामुळे आमच्याबरोबर तुम्हालाही पुण्य लाभेल. अशी बतावणी केली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रजपूत यांनी आपल्या गळ्यातील सुमारे सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून कागदावर ठेवली.भामट्यांनी त्यानंतर हातचलाखी करत त्या कागदाची पुडी बांधून ती रजपूत यांच्या हाती दिली आणि “ही पुडी लगेच उघडू नका,” असे सांगितले. काही वेळातच ते दोघेही दुचाकीवरून तेथून पसार झाले.त्यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते.संशय आल्याने काही वेळानंतर रजपूत यांनी ती कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्याची चेन नसून काळी राख असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुटुंबियांना तसेच शेजाऱ्यांना त्याबाबत माहिती देत कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे अधिक तपास करत आहेत.