LIVE UPDATES

मोरगावात निष्पाप गायीची गोळी झाडून हत्या ?

अज्ञाताविरोधात शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 19:50 PM
views 35  views

दोडामार्ग : मोरगाव येथे एका निष्पाप गायीवर बंदुकीची गोळी झाडल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोविंद बाळा दळवी या शेतकऱ्याच्या दुधाळ गायीवर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडल्याचा संशय असून, याप्रकरणी त्यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी नेहमीप्रमाणे गोविंद दळवी यांनी आपली गुरे चरण्यासाठी सोडली होती. सायंकाळी सर्व गुरे घरी परतली; मात्र एक जरशी गाय घरी आली नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसरात गायीचा शोध घेतला. अंधार झाल्याने शोध मोहीम थांबवावी लागली.

मंगळवारी सकाळी दळवी यांनी लगतच्या काजू बागेत पुन्हा शोध घेतला असता गाय जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आली. जवळ जाऊन पाहिले असता गायीच्या पोटातून रक्त येत असल्याचे दिसले. गायीच्या पोटावर गोळी लागून ती आरपार गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

ही गोळी नेमकी शिकारीच्या उद्देशाने झाडण्यात आली की अन्य कोणत्या कारणातून हे कृत्य करण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.