LIVE UPDATES

निरुखे सुतारवाडीत अवैध बंदूक निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 28, 2026 15:13 PM
views 2944  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे अत्यंत गुप्तपणे सुरू असलेला अवैध बंदूक निर्मितीचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) टाकलेल्या धाडीत उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका ६५ वर्षीय इसमाला अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, निरुखे सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे अग्निशस्त्रे तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. २७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली.

कारवाईतील प्रमुख मुद्दे:

या धाडीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्र निर्मितीचे साहित्य आणि तयार शस्त्रे जप्त केली आहेत. त्यात प्रामुख्याने ३ तयार अग्निशस्त्रे (बंदुका), ६ लोखंडी बॅरल, ४ बंदुकीचे लाकडी बट, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर आणि शस्त्र निर्मितीसाठी लागणारी इतर उपकरणे सापडली आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत १ लाख १४ हजार ६०० रुपये इतकी आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५, रा. निरुखे सुतारवाडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी मेस्त्री याच्यावर भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ३, ५ व २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, या बंदुका कोणाला विकल्या जाणार होत्या किंवा याचा आणखी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.