
कणकवली : ऐन होळी सणा दिवशीच कणकवली शहरानजीक वागदे गावात घरफोडी करून चोरट्यानी 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 25 हजार रुपये लंपास केले आहेत. वागदे गडनदी पुलानजीक साईपार्क अपार्टमेंट मधील रहिवासी सचिन विलास वंजारी यांचा राहता फ्लॅट फोडून हि चोरी करण्यात आली आहे.
एस एस पी एम इंजिनायरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले इंजिनिअर सचिन वंजारी हे होळी सणानिमित्त आपल्या मूळ गावी सावंतवाडी येथे 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता कुटुंबासह गेले होते. 2 मार्च रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता वंजारी यांच्या वरील फ्लॅटमध्ये राहणारे ऍड नितीन म्हापणकर यांनी सचिन वंजारी यांना मोबाईल कॉल करून वंजारी यांच्या राहत्या फ्लॅटचा दर्शनी दरवाजा उघडा दिसत असून कडी तुटलेली आहे. लागलीच सचिन वंजारी आपल्या पत्नीसह सावंतवाडीहून वागदे येथील आपल्या फ्लॅटवर आले असता त्यांना घरफोडी झालेली दिसून आली. वंजारी यांच्या फ्लॅटमधील लोखंडी कपाट फोडून आतील लोकर मध्ये ठेवलेले सोन्याचे 17 ग्रॅम वजनाचे कान चैनीसह कुडी जोड, एकूण 22 ग्राम वजनाच्या तीन अंगठ्या, 15 ग्राम वजनाची चेन असे एकूण 5 तोळे 40 ग्रॅम वजनाचे सुमारे 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम 25 हजार असा एकूण 5 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी चोरला आहे. याबाबत सचिन वंजारी यांनी 3 मार्च रोजी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात बीएनएस चे कलम 331 ( 3 ), 331 ( 4 ) 305 ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सचिन वंजारी यांनी वागदे येथील आपल्या फ्लॅटवर 2 मार्च रोजी आल्यानंतर लागलीच कणकवली पोलीस ठाण्यात चोरीबाबत फोन करून माहिती दिली होती. चोरीची घटना समजताच तात्काळ कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक माहिती घेतली. कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली असून चोरीचा तपास सुरू केला आहे. तसेच एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीएसआय अनिल हाडळ तसेच सहकारी पोलीस अमलदारांनी समांतर तपास सुरू केला आहे.












