
वेंगुर्ला : वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मुंबईतील कुर्ला येथून एका अट्टल घरफोड्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. बासेरुल गुलमोहर शेख (वय ४५, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. शांतीनगर झोपडपट्टी, कळवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
घटनेची पार्श्वभूमी व पोलीस कारवाई
वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १११/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४), ६२ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल होता. गुन्हा केल्यापासून आरोपी आपले वास्तव्य लपवून फरार होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या पथकाला आरोपीबाबत ठोस माहिती मिळाली. आरोपी २१ जून २०२६ रोजी रेल्वेने आपल्या मूळ गावी (पश्चिम बंगाल) पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी मुंबईतील कुर्ला झोपडपट्टी परिसरात सापळा रचला आणि त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने वेंगुर्ला येथील गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
अटक करण्यात आलेला आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लखनऊ (उत्तर प्रदेश), पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्येही घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या पथकाने केली कारवाई
सदरची धडक कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार डॉमिनिक डिसोझा, जँक्शन घोन्सालवीस, ज्ञानेश्वर तवटे, पोलीस शिपाई अमर कांडर यांनी तसेच अंगुलीमुद्रा विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मागाडे, पोलीस कोस्टबल सावंत, महिला पोलीस हवालदार तनुजा राहुल, पोलीस हवालदार अमित तेली, चालक पोलीस नाईक संकेत खाड्ये, सायबर विभागाच्या महिला पोलीस शिपाई धनश्री परब आणि पोलीस शिपाई युवराज भंडारी यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.














