LIVE UPDATES

गुटखा विक्रेत्यांनो सावधान !

आता थेट मकोका लागणार?
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 13:48 PM
views 143  views

आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश

मुंबई : महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही त्यांची तस्करी, साठवणूक आणि विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी आता गुटखा विक्री करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा आणि पानमसाला विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या अवैध व्यापारामागील संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पानटपऱ्या, स्टॉल आणि काही दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्री होत असल्याची चर्चा आहे. विशेषतः कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये यावर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. आता सिंधुदुर्ग अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबत कोणती कठोर पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अलीकडेच महाराष्ट्र FDA कडून राज्यभर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून गुटखा विक्रेते, साठेबाज आणि भेसळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी संबंधित आस्थापना सील करण्याची कारवाईही करण्यात आली आहे.

कणकवली शहरातही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही हॉटेल आणि दुकानांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता नव्या आदेशानंतर गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.