
सावंतवाडी : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि भरवस्तीत असलेल्या कॉसमॉस बिल्डिंग परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रंजना पांडुरंग ठाकूर (वय ५९, रा. कॉसमॉस पॅराडाईज, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. श्रीमती ठाकूर या त्यांच्या एका सहकारी महिलेसोबत कॉसमॉस पॅराडाईज बिल्डिंगच्या खाली काम करत उभ्या होत्या. याचवेळी एक अनोळखी तरुण काहीतरी माहिती विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आला. या बिल्डिंगमध्ये शेअर मार्केटचे काम कोण करतात? अशी चौकशी त्याने ठाकूर यांच्याकडे करण्यास सुरुवात केली. संबधित तरुणाच्या तोंडात गुटखा भरलेला होता. त्याच्या बोलण्यावरून आणि हालचालींवरून संशय आल्यामुळे श्रीमती ठाकूर यांनी त्याला 'याबाबत सोसायटीच्या चेअरमनकडे विचारपूस कर' असे सांगितले.
हा संवाद सुरू असतानाच, त्या तरुणाचे लक्ष स्थानिक नगरसेविका नीलम नाईक यांच्या फ्लॅटच्या दिशेने होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, श्रीमती ठाकूर या पाठी वळताच तरुणाने क्षणाचाही वेळ न घालवता त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जोरात हिसकावून पलायन केले. बिल्डिंगच्या गेटबाहेर त्याचा दुसरा साथीदार आधीच दुचाकी चालू ठेवून सज्ज उभा होता. चेन गळ्यातून काढताच चोरटा पळत जाऊन दुचाकीवर बसला आणि दोघांनी त्वरित जेलच्या दिशेने पोबारा केला. श्रीमती ठाकूर यांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवून स्वतःच्या दुचाकीवरून चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतु, चोरटे वेगाने पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्या पेहरावावरून ते दोन्ही तरुण बिहारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका नीलम नाईक यांनी तातडीने पोलिसांना या संदर्भात कल्पना दिली आणि घटनास्थळी धाव घेतली. नीलम नाईक यांनी पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आवाहन केले. मात्र, शहरातील संभाजी चौक येथील सीसीटीव्ही बंद असल्याचे आणि जेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत नगरसेविका सौ. नाईक यांनी पोलिसांना या संदर्भात लेखी पत्र देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कॉसमॉस पॅराडाईज समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित व्यक्ती दुचाकीवरून जाताना कैद झाल्या आहेत.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संशयित दुचाकीस्वार कॅमेऱ्यात दिसले असले, तरी अद्याप त्यांची स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक स्वतः करत आहेत. मात्र, भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे सावंतवाडीतील नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी होत आहे.












