LIVE UPDATES

दीड कोटींची गोवा बनावटीची दारू जप्त

राजस्थानातील चालक ताब्यात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 04, 2026 17:34 PM
views 378  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्ग : 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यात आणखी एक मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोव्याहून मुंबईकडे अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेली गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली असून या प्रकरणी राजस्थानातील एका चालकाला अटक करण्यात आले आहे . ही कारवाई शनिवार ४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जिजामाता चौक, ओरोस येथे करण्यात आली. पोलिसांनी संशयित टाटा सिग्मा दहा टायर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली. या प्रकरणी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईदरम्यान १ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू, ३५ लाख रुपये किमतीचा टाटा सिग्मा दहा टायर ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक फौजदार सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोझा तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजिस्कर आणि ऋषिकेश टोपले यांच्या पथकाने केली. अवैध मद्यवाहतुकी विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी सलग मोठ्या कारवाया सुरू ठेवल्या असून या कारवाईमुळे मद्यतस्करांचे धाबे दणाणले आहेत. याबाबतचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.