LIVE UPDATES

Sunil Tatkare Mandangad : मंडणगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी घेतला सर्व विभागांचा आढावा

जनतेच्या प्रश्नांवर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तटकरे नाराज : कामे वेळेत मार्गी लावण्याचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 18:22 PM
views 19  views

मंडणगड : तालुक्यातील विविध विकासकामे आणि जनतेच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ५ ऑक्टोबर २०२६  रोजी मंडणगड नगरपंचायतीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील प्रशासनाच्या प्रमुख विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना जनतेच्या प्रश्नांवर प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्याने खासदार तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकहिताची कामे प्रशासकीय पातळीवर विनाकारण रखडवून ठेवू नयेत. विकासकामांना अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाकडे वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून आवश्यकतेनुसार पोलिसांत तक्रार करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा स्पष्ट इशारा खासदार तटकरे यांनी यावेळी दिला.

बैठकीत पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, महावितरण, नगरपंचायत, कृषी विभाग यांसह विविध शासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

जलजीवन मिशनच्या तक्रारी पंधरा दिवसांत निकाली काढा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेताना जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे पुढील पंधरा दिवसांत प्रांताधिकारी यांच्या देखरेखीखाली निराकरण करण्याच्या सूचना खासदार तटकरे यांनी दिल्या. योजनेच्या कामात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंबडवे–राजेवाडी मार्गाच्या गुणवत्तेबाबत सूचना

तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आंबडवे ते राजेवाडी मार्गाच्या कामाचा आढावा घेताना मंडणगड तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हा मार्ग दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यात यावा, अशा सूचना संबंधित अभियंत्यांना देण्यात आल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश देतानाच रस्त्यांच्या नूतनीकरणामुळे निर्माण झालेल्या वीजखांबांच्या स्थलांतराचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. महावितरण विभागाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

बसस्थानकातील स्वच्छतागृहासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश

मंडणगड एसटी बसस्थानकाच्या आवारात स्वच्छतागृहासाठी खासदार तटकरे यांनी निधी उपलब्ध करून दिला असतानाही जागेअभावी काम रखडल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. यावरून त्यांनी संबंधित आगार अधिकाऱ्यांना जाब विचारत जागा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

मंडणगड शहरातील पाणीप्रश्नाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

“समन्वयाने विकासाचे प्रश्न मार्गी लावा”

“राज्य व केंद्र शासनाकडून खासदार या नात्याने सूचित करून मंजूर केलेली विकासकामे प्रशासकीय पातळीवर अडकवून ठेवणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे. अधिकाऱ्यांनी नियमांच्या चौकटीत काम करताना विनाकारण अडचणी निर्माण करू नयेत. प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करून विकासाचे प्रश्न वेळेत मार्गी लावावेत,” असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

या आढावा बैठकीस प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, बांधकाम अभियंता राम जाधव अभिजीत झेंडे देवकीनंदन सकपाळे आगारव्यवस्थापक एम.पी.जुनेदी नगराध्यक्षा सोनल बेर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संदीप राजपुरे, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, भाई पोस्टुरे, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती दिनेश लेंडे, नगरसेविका रेष्मा मर्चंडे, सौ. सापटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.