LIVE UPDATES

नामांकित लॉजवर पोलिसांचा छापा, देहव्यापारप्रकरणी महिला ताब्यात

शहरात खळबळ : एलसीबी आणि चिपळूण पोलिसांची संयुक्त कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 06, 2026 15:52 PM
views 435  views
Chiplun Police conduct a raid on a lodge in an alleged prostitution racket case (AI Image)

चिपळूण : शहरातील एका गजबजलेल्या भागातील नामांकित लॉजवर एलसीबी आणि चिपळूण पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून सुरू असलेला अनैतिक देहव्यापार उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत एका स्थानिक महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, मुंबईहून आणलेल्या पीडित महिलेला रत्नागिरी महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

चिपळूण शहरामधील गजबजलेल्या भागात या लॉजवर महिलांचा वापर करून अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे रत्नागिरी एलसीबी पथक आणि चिपळूण पोलिसांनी कारवाईसाठी महिला हवालदारांना सोबत घेत पथक तयार केले आणि त्या लॉजवर एक बनावट गिऱ्हाईक पाठविले. या बनावट गिऱ्हाईकाने संबंधित महिलेची भेट घेतली आणि तिने सांगितलेली रक्कम तिच्या स्वाधीन केली. त्यानंतर बनावट गिऱ्हाईकाने खबर पक्की असल्याचा संदेश पोलिसांना कळविला. तेव्हा संयुक्त पथकाने ताबडतोब छापेमारी केली. या कारवाईत मुंबईमधून आणलेली पीडित महिला रूममध्ये आढळली. तर हा व्यवसाय करणाऱ्या महिलेला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. हा अनैतिक व्यवसाय करणारी महिला ही चिपळूणची राहाणारी असून तिने मुंबईहून ३० वर्षीय महिलेला अनैतिक देह व्यापारासाठी चिपळूणमध्ये आणले होते अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली.

दरम्यान या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ माजली असून जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चिपळूण शहरात असे अनैतिक धंदे उघडकीस येऊ लागल्यामुळे नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत आहे. चिपळूणचीच एक महिला अनैतिक व्यवसायासाठी मुंबईहून दुसऱ्या एका महिलेले आणते आणि राजरोस अनैतिक व्यवसाय करते. या प्रकारामुळे शहरातील नागरिक चांगलेच हादरले आहेत. चिपळूण पोलीस आणि एलसीबी पथकाने वेळीच ही कारवाई केल्यामुळे पोलिसांवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.