LIVE UPDATES

Cyber Fraud : गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून एकाला ६.४८ लाखांचा गंडा

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल : नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 06, 2026 14:14 PM
views 172  views
Ratnagiri man cheated of ₹6.48 lakh in fake gas connection disconnection cyber fraud

रत्नागिरी : गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची भीती दाखवत रत्नागिरीतील एकाची ६ लाख ४८ हजार ६१२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर एका गॅस एजन्सीची अपडेट नावाची एपीके फाईल पाठवून त्याद्वारे डेबिट कार्डची माहिती मिळवून ही फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर- सिद्धीविनायक नगरातील रहिवासी रमेश विश्राम खापरे (वय ५४, व्यवसाय – शिक्षक) यांना ४ ऑगस्ट रोजी दुपारी एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ‘एका गॅस एजन्सी’मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा गॅस पुरवठा लवकरच बंद होणार असून तो सुरू ठेवण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर संबंधित व्यक्तीने खापरे यांच्या व्हॉट्सॲपवर ‘एका गॅस कंपनीच्या बिल अपडेट नावाची एपीके फाईल पाठवली. ती फाईल उघडून ॲप इन्स्टॉल करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ॲपमध्ये डेबिट कार्डसंबंधी माहिती भरण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर खापरे यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ६ लाख ४८ हजार ६१२ रुपये काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अनोळखी एपीके फाईलपासून सावधान

सायबर गुन्हेगारांकडून वीज बिल, गॅस बिल, बँक खाते किंवा केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली नागरिकांना एपीके फाईल पाठवून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर आलेली एपीके फाईल इन्स्टॉल करू नये. तसेच डेबिट/क्रेडिट कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, पासवर्ड किंवा ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सध्या एका गॅस कंपनीच्या नावाने कनेक्शन डिसकनेक्ट होणार असल्याचा फेक मेसेज फिरत आहे. नागरिकांनी सतर्क राहून फेक कॉल, मेसेजना बळी पडू नये, आपले बॅंकिंग डिटेल्स तसेच कोणतेही ओटीपी शेअर करू नये, आवाहन सायबर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांनी केले आहे.