
कणकवली : तालुक्यातील ओटव येथील काही काळासाठी बंद असलेली दोन घरे फोडून तब्बल ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरणारा चोरटा राजू तुकाराम सुतार (३५, मूळ रा.नाधवडे, ता. वैभववाडी, आधार कार्डवरील पत्ता कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, काळंबा वसध्या रा. विरार पूर्व, जि. पालघर) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकाने विरार येथूनच बुधवारी अटक केली. विशेष म्हणजे घरफोड्यांतील काही मुद्देमालही पथकाने हस्तगत केला. चोरट्याला कणकवली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
या घरफोड्या १७ जूलैला सकाळी ८.३० ते रात्री ११ वा. मुदतीत घडल्या होत्या. चोरट्याने दिनेश शशिकांत कोरगांवकर व त्यांचे शेजारी नितेश रमेश देवळे यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करुन दोन मोबाईल, एटीएम कार्ड, रोख रक्कम, स्मार्ट वॉच व इतर कागदपत्र मिळून ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना सदर घरफोड्या राजू सुतार याने केल्याचे एलसीबी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने विरार गाठून त्याला अटक केली. राजू सुतार रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याने कोल्हापूर, वैभववाडी, सांगली अशा भागांमध्ये घरफोडी, चोर्यांचे गुन्हा केले असल्याचेही एलसीबीच्या पथकाने सांगितले.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या सूचनेनुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे व किरण देसाई यांनी केलेली.












