
रोहा : शेतकऱ्यांच्या घामाला आणि मातीतून उभ्या राहिलेल्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देणारी आगळीवेगळी परंपरा रायगड जिल्हा प्रेस क्लबने गेली १६ वर्षे अखंडपणे जपली आहे. पुरस्कार वितरणासाठी सभागृहात शेतकऱ्यांना बोलावण्याऐवजी थेट त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्याच्या या उपक्रमातून शेती आणि शेतकऱ्यांप्रती असलेला आदर पुन्हा अधोरेखित झाला. यंदा रोहा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी नितीन पिंपळे आणि प्रगतशील महिला शेतकरी लीलाताई मोरे यांचा त्यांच्या शेतावर जाऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
रोहा-अष्टमी येथील सुपुत्र नितीन पिंपळे यांनी तांबडी-निवी ठाकूरवाडी परिसरात विविध दुर्मिळ फळझाडे, औषधी वनस्पती आणि वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनासोबतच शाश्वत शेतीचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या हस्ते त्यांना 'कृतिशील प्रगतशील शेतकरी' सन्मान प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शेताची पाहणी करून विविध प्रयोगांची माहिती घेत कौतुकाची थाप दिली.
या प्रसंगी ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी धनंजय जोशी, अष्टमीचे अध्यक्ष महादेव साळवी, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, कृषी अधिकारी जोगदंड, शेतकरी नितीन पवार, संतोष दिवकर, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे, संपादक राजेंद्र जाधव तसेच परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर करंजविरा येथील प्रगतशील महिला शेतकरी लीलाताई मोरे यांचाही त्यांच्या शेतावर जाऊन गौरव करण्यात आला. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब, सातत्यपूर्ण परिश्रम आणि कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 'प्रगतशील शेतकरी' सन्मान राजीपचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सरपंच बाळाराम मोरे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे, प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शेतकरी हा देशाच्या अन्नसुरक्षेचा खरा आधारस्तंभ असल्याचे नमूद करत, शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना समाजाने प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या कार्याचा सन्मान हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या कष्टाची समाजाकडून घेतलेली अर्थपूर्ण दखल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या या उपक्रमामुळे प्रगतशील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असून, शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ऊर्जा नव्या पिढीला मिळत आहे. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचे रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे यांनी स्पष्ट केले.













