LIVE UPDATES

बस स्थानकातील भीषण वास्तव समोर

महिला सुरक्षिततेसाठी नगराध्यक्षांकडून डेपोला धडक : 'कोकणसाद LIVE' च्या मुक्त संवादात Gen Z नी वेधलेलं लक्ष
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 25, 2026 21:17 PM
views 78  views

सावंतवाडी : बसस्थानकात महिलांच्या सुरक्षिततेबाबतची व्यथा कोकणसादच्या युवा विश्व कार्यक्रमात शालेय विद्यार्थीनींनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासमोर मांडली होती. यानंतर आज त्यांनी सायंकाळी बसस्थानकात जात समस्या जाणून घेतल्या. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सावंतवाडी बसस्थानकात जाऊन त्यांनी विद्यार्थी, महिलांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांनी आपली कैफियत नगराध्यक्षांसमोर मांडली. यावेळी सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर,नीलम नाईक, सुनिता पेडणेकर, श्री. नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, शालेय विद्यार्थ्यांनीकडून छेडछाड झाल्याची तक्रार केली होती.‌ त्यामुळे आज आम्ही भेट दिली असून महिला पोलीस बसस्थानकात नेमण्याची मागणी केली आहे. येथील पोलीस चौकी देखील बंद असून वेंगुर्ला स्थानकात थांबलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेतल्याचे त्यांच्याकडून सांगितले. त्यामुळे त्यांना रिक्षाने जावे लागलं. ही परिस्थिती गंभीर असून याठिकाणी मद्यपान करून लोक बसलेले असतात. दारूच्या बाटल्या इथे पडलेल्या आहेत.

महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून रात्रीच्यावेळी दोन पोलिस कॉन्स्टेबल उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना चांगली सुविधा मिळावी हा आमचा हेतू आहे. 'पिंक टॅक्सी' सारखी संकल्पना शहरात राबविण्यासाठी आमचा भर आहे. युवा दिनी कोकणसादच्या चर्चेत विद्यार्थींनीनी यावर लक्ष वेधले होते. त्यानुसार आज पाहणी केली असून महिलांची सुरक्षितता राखण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून सहकार्य करू असे आश्वासन दिले. 

दरम्यान, यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. यानंतर स्थानक प्रमुख गौतमी कुबडे यांनी स्थानकात येत नगराध्यक्षांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांना बस मध्ये न घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, सायंकाळी ७ नंतर पुढील बस या मुख्य स्थानकातूनच सोडल्या जातील.

वेंगुर्ला स्थानकातून त्या सोडणार नसल्याचे स्थानक प्रमुखांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षांनी हिरकणी कक्ष व पोलीस चौकीत महिला कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यासाठी तात्काळ पत्रव्यवहार करण्यास सांगितले. आपल्या माध्यमातून देखील महिला सुरक्षिततेसाठी सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.