
कुडाळ : सावंतवाडी वनविभागांतर्गत कुडाळ वनपरिक्षेत्रातील नेरूर कर्याद नारूर येथील शासकीय राखीव जंगलात औषधी वनस्पतीची तस्करी करणाऱ्या टोळीवर वनविभागाने कारवाई केली आहे. या मोहिमेत ‘सप्तरंगी’ या औषधी वनस्पतीची अवैध तोड करून वाहतूक करणाऱ्या एका इसमास रंगेहात पकडण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे ५६ हजार ६९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहाटेच्या गस्तीत तस्करी उघड
३ मार्चच्या रात्री वनविभागाचे पथक नेरूर परिसरात गस्त घालत होते. ४ मार्च रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास कक्ष क्रमांक ९०ए च्या पायथ्याशी असलेल्या कोरड्या नदीपात्रातून एक इसम डोक्यावर ओझे घेऊन डांबरी रस्त्याकडे येताना दिसला. संशय आल्याने पथकाने त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याच्याकडे सप्तरंगी वनस्पतीची मुळे आणि फांद्या आढळून आल्या.
जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपी
आरोपीचे नाव: विठ्ठल लक्ष्मण लगड.
जप्त मुद्देमाल: २६ पोत्यांमध्ये भरलेली ९६१ किलो सप्तरंगी वनस्पती.
किंमत: अंदाजे ५६,६९९ रुपये.
तपासादरम्यान विठ्ठल लगड याने इतर फरार आरोपींच्या संगनमताने राखीव वनात बेकायदेशीर प्रवेश करून ही तोड केल्याची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ५ मार्च २०२६ पर्यंत वनकोठडी (फॉरेस्ट कस्टडी) सुनावण्यात आली आहे.
कारवाईतील पथक
ही कारवाई उपवनसंरक्षक मिलिंद दत्त शर्मा व सहायक वनसंरक्षक एस. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार यांनी केली. या मोहिमेत वनपाल संतोष गोरे, वनरक्षक निखिल खोत, शिवाजी पाटील, किरण गोसावी आणि सावळा कांबळे यांनी सहभाग घेतला.
फरार आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.












