LIVE UPDATES

भीषण आग ; मांगर जळून खाक

Edited by: विनायक गांवस
Published on: March 30, 2026 19:02 PM
views 279  views

सावंतवाडी : येथील कापूसेवाडी भागात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका खासगी मांगराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत रोपिन डुमिंग फर्नांडिस यांच्या मालकीच्या मांगरातील शेती साहित्य व इतर वस्तू जळून खाक झाल्या असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कापूसेवाडी येथील घर क्रमांक १०६ चे मालक रोपिन फर्नांडिस यांच्या मांगराला गुरुवारी पहाटे अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा दिसताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. किनळे सरपंच दिपक नाईक, उपसरपंच शिशिल फर्नांडिस आणि कैतान फर्नांडिस यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचा वेग इतका प्रचंड होता की मांगरातील सामानाला वाचवणे शक्य झाले नाही.

आग विझली तोपर्यंत मांगरातील सर्व उपयोगी वस्तू जळून कोळसा झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने खालील साहित्याचा समावेश आहे:

 पीव्हीसी पाईप, शेतीची अवजारे आणि इतर साधने. ५० नारळ, बादली, मौल्यवान लाकूड सामान व घरगुती वस्तू आगीत जळून खाक झाले.  घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अनुजा भास्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून रीतसर पंचनामा केला आहे. या आकस्मित संकटामुळे फर्नांडिस कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून, शासनाकडून त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.