
कथित भ्रष्टाचाराच्या तपासात महत्त्वाची कारवाई
बेळगाव : बेळगाव विभागाचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या धाडीत तब्बल १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अबकारी परवाने मंजूर करणे आणि नूतनीकरण प्रक्रियेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या तपासात ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजता बेळगावातील टीव्ही सेंटर परिसरातील मंजुनाथ यांच्या निवासस्थानी सुरू झालेली झडती जवळपास २४ तास सुरू होती. गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजता ही कारवाई पूर्ण झाली. या काळात ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरातील आर्थिक कागदपत्रांची सखोल तपासणी केली तसेच कुटुंबीयांकडूनही विविध बाबींवर माहिती घेतली.
कारवाई पूर्ण झाल्यानंतर ईडीने अधिकृतपणे जाहीर केले की, या शोधमोहिमेदरम्यान एकूण १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५.५ कोटी रुपयांची रोकड, ७.८ कोटी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ३.३ लाख रुपये मूल्याचे परदेशी चलन यांचा समावेश आहे.
याशिवाय कॅश बुक, रिअल इस्टेट व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे आणि इतर नोंदीही ईडीच्या ताब्यात आल्या आहेत. या दस्तऐवजांच्या आधारे कथित बेकायदेशीर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांचा तपास अधिक वेगाने सुरू असल्याचे समजते. या प्रकरणात ईडीने बेळगाव, बेंगळुरू आणि म्हैसूर येथील एकूण १४ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत वरिष्ठ अबकारी अधिकारी वाय. मंजुनाथ, जगदीश नायक आणि के. एम. तम्मण्णा यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता.
झडतीदरम्यान अधिकाऱ्यांच्या हाती एक डायरी लागली असून, त्यामध्ये विविध मद्यविक्री परवान्यांच्या मंजुरी व नूतनीकरणासाठी दारू दुकानांकडून दरमहा कथितरित्या घेतल्या जाणाऱ्या लाचेच्या रकमांची नोंद असल्याचा दावा ईडीने केला आहे. तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कथित लाचेचा पैसा बेनामी व्यवहारांद्वारे आणि नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे. या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.
वाय. मंजुनाथ हे कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे मेहुणे आहेत. मात्र, ईडीने आपल्या अधिकृत निवेदनात मंत्र्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध जोडलेला नाही. तपास केवळ जप्त करण्यात आलेल्या पुरावे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित अधिकाऱ्यांपुरता मर्यादित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.














