LIVE UPDATES

गोव्यातील ॲसिड हल्ल्याचे दोडामार्ग कनेक्शन

सुडाचं प्रकरण ; कळणेच्या निलेश देसाईला अटक
Edited by:
Published on: June 30, 2025 18:30 PM
views 1826  views

दोडामार्ग :  गोव्यातील धारगळ  - पेडणे येथील सुकेकुळण परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या ॲसिड हल्ल्याचे कनेक्शन महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्याशी असल्याचा पोलिसांचा अंदाज अखेर खरा ठरला आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी सायंकाळी निलेश गजानन देसाई कळणे याला म्हापसा येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

सोमवार २० जून २०२५ ला सकाळी अज्ञात दुचाकीस्वारांनी केलेल्या ॲसिड हल्ल्यात १७ वर्षांचा ऋषभ उमेश शेट्ये हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे.

सुकेकुळण - धारगळ येथे ऋषभ बसची वाट पाहत थांबला होता. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्यावर ॲसिड फेकले. ऋषभ म्हापशातील उच्च माध्यमिक विद्यालयात शिकतो. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आजचा हा हल्ला असण्याची शक्यता असून पोलीस काही व्यक्तींचा त्यादृष्टीने शोध घेत होते. 

या हल्ल्यात दोडामार्ग तालुक्यातील एका व्यक्तीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्यादृष्टीने तपास सुरु झाला. याप्रकरणी दोडामार्ग  - कळणे येथील निलेश गजानन देसाई याला म्हापसा येथे पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका गंभीर घटनेचा सूड घेण्याचा हा प्रकार असावा असेही पोलिसांना वाटते. मात्र सर्व बाजूंनी पोलीस या घटनेची चौकशी करत असून आता संशयित ताब्यात आल्याने या घटनेचा उलगडा करणार आहेत.