LIVE UPDATES

अवैध दारू वाहतुकीवर देवगड पोलिसांची धडक कारवाई

वाहनासह ४ लाख ७७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 05, 2026 14:10 PM
views 56  views

एकाविरुद्ध गुन्हा दाखल

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे, बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक तसेच अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिल्यानंतर देवगड पोलिसांनी कोटकामते येथे मोठी कारवाई करत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल ४ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ जून २०२६ रोजी कोटकामते, ता. देवगड येथील रहिवासी विशाल राजेश गावकर (वय २१) हा अवैध गावठी दारूची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती देवगड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून सापळा रचला.

दि. ५ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास कोटकामते ते नारिंग्रे मार्गावर संशयित आरोपीच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली. यावेळी आरोपीच्या ताब्यातील ओमनी वाहन (क्रमांक MH ०७ AN ९१४५) अडवून त्याची झडती घेण्यात आली. वाहनामध्ये बॉब्स लेमन व्होडका, हनी ब्लेंड प्युअर ब्रँडी आणि मॅकडॉवेल्स नं १  या ब्रँडची तसेच गावठी दारूची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी वाहनातून विविध प्रकारची दारू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत रु. २,२७,८०० इतकी असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले रु. २,५०,००० किमतीचे ओमनी वाहन देखील ताब्यात घेण्यात आले. अशाप्रकारे एकूण रु. ४,७७,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विशाल राजेश गावकर याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून गुन्ह्याचा तपास पोहेकॉ./१४० गणपती गावडे करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या पथकात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार, पोलीस हवालदार गणपती गावडे , महेंद्र महाडिक, प्रथमेश कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र महाले, प्रतीक जाधव  यांनी सहभाग घेतला.