LIVE UPDATES

१५ ते १८ कोटींची आलिशान वाहने अद्याप नाही जप्त ?

१८५ कोटींचा शेअर मार्केट घोटाळा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 03, 2026 11:59 AM
views 314  views

ठाणे : ठाणे नगर पोलीस ठाण्या अंतर्गत सागर करिवडेकर, सचिन राणे, प्रिती राणे व इतर आरोपींविरुद्ध BNS आणि MPID Act अंतर्गत १८५ कोटींच्या कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून १ हजार ३५८ हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. तर आरोपी व नातेवाईकांकडील जवळपास १५ ते १८ कोटींची आलिशान वाहने अद्याप जप्त न केल्याने याबाबत गुंतवणूक दारांनी सवाल उपस्थित केलाय.

तपास अधिकारी रवींद्र मांडलिक यांनी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात सादर केलेल्या Say, Affidavit आणि Remand Reports च्या आधारे गुंतवणूकदारांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुंतवणूकदारांचा आरोप न्यायालयीन कागदपत्रांनुसार आतापर्यंत केवळ तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप जप्त न झालेल्या आलिशान वाहनांची एकूण किंमत अंदाजे १५ ते १८ कोटींपेक्षा अधिक असू शकते  असा दावा गुंतवणूकदारांनी केला असून त्या वाहनांवर जप्तीची कारवाई का करण्यात आलेली नाही ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

उल्लेखित वाहने BMW 530i, BMW X7, Mercedes Maybach, Porsche Panamera GTS, Audi Q7, Toyota Fortuner, BMW X1,  Toyota Fortuner,  Lamborghini Urus आदी वाहने सागर कारिवडेकर, प्रिती राणे, सलोनी कारिवडेकर आदींच्या नावे आहेत. आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावरील अंदाजे १५ ते १८ कोटींपेक्षा अधिक किमतीची आलिशान वाहने जप्त करून त्यांचा लिलाव केल्यास पीडित गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, ही कारवाई अद्याप का करण्यात आली नाही ? असा सवाल गुंतवणूक दारांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांच्याकडे संबंधित RTO कडून माहिती मागवून सागर करिवडेकर, सलोनी करिवडेकर, सचिन राणे, प्रिती राणे व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील सर्व आलिशान वाहनांवर तातडीने जप्तीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांचे वकील ॲड. राजेश दत्तू काकड यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मुंबई यांना सादर केलेल्या निवेदनातील माहिती तसेच न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती प्राप्त झाली आहे.