LIVE UPDATES

गोवंश मांस वाहतूक प्रकरण ; फरार आरोपीस सावंतवाडीत अटक

Edited by: कोकणसाद Live न्यूज नेटवर्क
Published on: June 26, 2026 23:57 PM
views 24  views

सावंतवाडी : महाराष्ट्रामध्ये गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असतानाही गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (रा. बाहेरचा वाडा, सावंतवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ला पोलिसांच्या पथकाने आज संयुक्तपणे सापळा रचून ही कारवाई केली.


१५ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी सरफराज हा सावंतवाडी येथून दुचाकीवरून २५ किलो वजनाचे गोमांस विक्रीच्या उद्देशाने घेऊन आजगावच्या दिशेने जात होता. धाकोरे रस्त्यावरून जात असताना जागरूक ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला. ग्रामस्थ पाठीमागे लागल्याचे पाहून आरोपीने स्वतःच्या ताब्यातील २५ किलो गोमांस उदय कृष्णा मुळीक (रा. धाकोरे) यांच्या काजूच्या बागेत फेकून दिले आणि दुचाकीसह तेथून पळ ठोकला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ वेंगुर्ला पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपिका मठकर या घटनास्थळी दाखल झाल्या. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (IPC) कलम ३२५, २७१ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (c) आणि ९ (A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून वेंगुर्ला पोलीस त्याचा शोध घेत होते. वेंगुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल असलेला सराईत आरोपी सरफराज ख्वाजा हा आज दुपारनंतर सावंतवाडी येथील बाहेरचा वाडा भागात आपल्या घराजवळ आल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी पोलिसांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक श्रीमती माधुरी मुळीक, प्रमोद पाटील, पोलीस हवालदार अमित राऊळ, मंगेश शिंगाडे, महेश निरवडेकर, पोलीस कॉन्स्टेबल पवन परब आणि श्रीमती नाईक यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपीच्या हालचालींवर शिताफीने निगराणी ठेवली.

   

दरम्यान, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. राठोड हे देखील आपल्या पथकासह सावंतवाडीत दाखल झाले. दोन्ही पोलीस पथकांनी मिळून रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपी सरफराज ख्वाजा याला ताब्यात घेतले. ही संपूर्ण कारवाई आज सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत अत्यंत गोपनीय आणि वेगाने करण्यात आली.

आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेंगुर्ला पोलीस करीत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडा बीटचे ठाणे अंमलदार प्रसाद कदम करीत आहेत.