
रोहा : रोहा तालुक्यातील निडी गावात एक धक्कादायक घटना घडली असून, प्रियकराने प्रियसीची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे रोहा शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये रोहा तालुक्यातील निडी गावचे रहिवासी रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांचा समावेश आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले असता त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यवसान अत्यंत दुर्दैवी घटनेत झाले. ही घटना १५ जूनच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील तसेच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात हलवले.
या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि त्यांचे पथक करत आहे. घटनेमागील नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.














