
विशेष सरकारी अभियोक्ता गुरुदास माजगावकर यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या मुलीचा परित्याग करून रुग्णालयातून पळ काढणाऱ्या देवगड तालुक्यातील दाम्पत्याला तब्बल चार वर्षांनंतर न्यायालयाने दोषी ठरवत तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी लवू तुकाराम निकम (वय ३०) आणि मंगल लवू निकम (वय २६, दोघे रा. मुणगे, ता. देवगड) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३१७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल मंगळवारी द्वितीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. पाटील यांनी देत दोन्ही आरोपींना प्रत्येकी तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात आरोपींनी आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला उपचारासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र २१ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजता कोणालाही कोणतीही माहिती न देता बालिकेला रुग्णालयात सोडून तेथून पलायन केले. बालिकेचा परित्याग करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याप्रकरणी रुग्णालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी केला. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता गुरुदास माजगावकर आणि सरकारी अभियोक्ता शिल्पा गोबाडे यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी अभियोक्ता गुरुदास माजगावकर यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अंमलदार महिला पोलीस शिपाई शिंदे (बकल क्र. १२५४) यांनी आवश्यक सहकार्य केले.














