
सावंतवाडी : सावंतवाडी येथील एका बँकेत २०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सांगलीतील एका गुन्ह्याशी या प्रकरणाचे धागेदोरे जुळल्याने, पोलिसांनी जेलमधून ६ आरोपींचा ताबा घेतला असून त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी सावंतवाडी शहरातील एका बँकेत भरणा करण्यात आलेल्या रकमेत २०० रुपयांच्या ८ नोटा बनावट असल्याचे बँकेच्या व्यवस्थापकांच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी बँक मॅनेजर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना सावंतवाडीत सापडलेल्या बनावट नोटांचे सिरीयल नंबर आणि सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील जप्त नोटांची 'सिरीज' एकच असल्याचे समोर आले. यामुळे या गुन्ह्यातील आरोपींचा यात समावेश असल्याचे स्पष्ट झाले.
सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींना सांगली जेलमधून ताब्यात घेतले आहे: यात सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (वय ३३, कोल्हापूर), इब्रार आदम इनामदार (वय ४४, कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, कोल्हापूर), सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, रा. मालाड-मुंबई), संदीप बाळू कांबळे (वय ३८, कोल्हापूर) या सहा जणांवर काल रात्री उशिरा अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक. पंकज शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बनावट नोटांचे हे रॅकेट नेमके कोठपर्यंत पसरले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.














