LIVE UPDATES

‘मसुरकर जेम्स’मधून बिबट्याची नखे आणि दातांसह लाखाचा मुद्देमाल जप्त

कुडाळमध्ये वनविभागाची मोठी कारवाई; आरोपीला २ दिवसांची वनकोठडी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 01, 2026 19:25 PM
views 82  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी आणि बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. कुडाळ बाजारपेठ येथील ‘मसुरकर जेम्स’ या दुकानातून बिबट्याची नखे, दात आणि इतर अवयवांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी सावंतवाडीच्या वनक्षेत्रपाल (सं.व.अ.नि.) यांना कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंतवाडी वनक्षेत्रपाल, त्यांचे अधीनस्थ कर्मचारी आणि कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे मौजे कुडाळ बाजारपेठ येथील ‘मसुरकर जेम्स’ या दुकानाची दोन पंचांसमक्ष झडती घेतली.

दुकानाच्या झडतीदरम्यान वनविभागाला अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी आढळून आल्या. दुकानातून  वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत बिबट्याची नखे ०६ नग, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली नखे ०६ नग, बिबट्याच्या नखांचे अवयव २० नग, बिबट्याचे दात (सुळे) ०२ नग अशी हस्तगत झाली आहेत.

हा सर्व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अन्वये अत्यंत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून, त्यापासून मृगयाचिन्हे तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगण्यात आला होता. वनविभागाने हा सर्व  मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वनक्षेत्रपाल सावंतवाडी यांनी आपल्या कार्यालयात प्र.गु.रि. ०७/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अजित वसंत मसुरकर याने वन्यप्राणी बिबट्याची नखे विक्रीच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याचा गुन्हा मान्य केला. त्यानंतर वनविभागाने त्याला अटक करून कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

 सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि कोल्हापूर दक्षता विभागाचे विभागीय वनअधिकारी संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे, कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल महेश पाटील, गौरेश राणे (पोह), मालवणचे वनपाल सदानंद परब, नेरूरचे वनपाल सूर्यकांत सावंत, वनरक्षक समीर खरवत, रवींद्र पाटील, ऋषिका होले, प्रसाद पाटील तसेच चालक राहुल मयेकर आणि नितीन सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसंपन्न असून येथे बिबट, रानगवा, सांबर, खवलेमांजर, पिसोरी अशा अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. हे प्राणी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन्यप्राण्यांची शिकार करणे, अवयव किंवा मृगयाचिन्हे बाळगणे अथवा त्यांचा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी ७ वर्षांपर्यंत कारावास आणि द्रव्यदंडाची (दंडाची) तरतूद आहे. नागरिकांना असे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास त्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.