बांधकाम व्‍यवसायिक खून प्रकरण ; मुकादमानेच झाडली गोळी

9 तासात पोलिसांनी केला खुनाचा उलगडा ; १९ वर्षीय अमर कदमला अटक
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 27, 2026 19:30 PM
views 244  views

कणकवली :कणकवलीतील प्रतिथयश बांधकाम व्‍यवसायिक सुशांत जनार्दन दळवी (वय ४०, मुळ रा. कळसुली – दळवीवाडी, सध्‍या रा. कणकवली - कनकनगर) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ७.३० वा. सुमारास कणकवली शहरातील कणकवली – कनेडी मार्गावरील मुडेश्‍‍वर मैदानानजीकच्‍या गणेशनगर येथील पाण्‍याच्‍या टाकीकडे जाणार्‍या मार्गावर, मोहन मळा या जंगलमय भागात आढळून आला. याबाबत पोलिसांच्‍या विविध पथकांनी गतिमान हालचाल करत सुशांत यांच्‍याकडे मुकादम म्‍हणून कामाला असलेला अमर सत्‍यवान कदम (वय १९, रा. ओरोस – डोंगरेवाडी) याला दुपारनंतर अटक केली.

सुशांत आणि अमर हे शिकारीसाठी मुडेश्‍‍वर मैदान परिसरात गेले होते, अशी कबुलीही अमर याने पोलिसांकडे दिली आहे. मात्र, अमर याने सुशांत यांच्‍यावर गोळी का झाडली, याचे कारण अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. त्‍याला शनिवारी न्‍यायालयात हजर केले जाणार आहे.

कामगारास दिसला मृतदेह

घटना अशी, मुडेश्‍‍वर मैदानानजीकच गणेशनगर असून तेथून साधारण एक किमी अंतरावर मोहन मळा हा जंगलमय भाग आहे. तेथील एका मांगरात काही परप्रांतिय कामगार राहतात. त्‍यातीलच एक कामगार शुक्रवारी सकाळी परिसरात भटकत असताना त्‍याला मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती कामगाराने आपले मालक जावेद शेख यांना दिली. त्‍यानुसार शेख व त्‍यांचे सहकारी तथा प्रतिथयश ठेकेदार अनिल पवार यांनी घटनास्‍थळी जाऊन पाहीले असता हा मृतदेह सुशांत दळवी यांचा असल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले.

…त्‍यामुळेच हा खून असल्‍याचे झाले स्‍पष्‍ट

शेख यांनी कळविल्‍यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्‍‍याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलवडे घटनास्‍थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता सुशांत यांच्‍या कपाळाला गोळी लागली होती. परिणामी खूप रक्‍तस्‍त्रावही झाला होता. विशेष म्‍हणजे घटनास्‍थळी मृतदेह फरफटत नेल्‍याच्‍या खुणा दिसून आल्‍या. या भागात पायवाट असून पायवाटेपासून जवळपास ३० फुटापर्यंत मृतदेह फरफटत नेण्‍यात आला असून पुढे जंगलमय भागात फेकल्‍याची बाब पोलिसांच्‍या निरीक्षणामध्‍ये स्पष्‍ट झाली. सुशांत यांचा मृत्‍यू बंदुकीची गोळी लागून झाला होता. मात्र, पोलिसांनी शोध घेऊनही घटनास्‍थळी बंदुक आढळली नाही. त्‍यातच पायवाटेनजीक वाहनाच्‍या टायरच्‍या खुणाही दिसल्‍या. अथार्तच हा घातपात नसून खून असल्‍याच्‍या निष्‍कर्षापर्यंत पोलीस पोहोचले.

वरिष्‍ठ पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्‍पर पोली अधीक्षक नयोमी साटम यांच्‍यासह विविध पोलीस अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले. श्‍‍वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्‍यात आले. दहीकर व साटम यांच्‍या सूचनेनुसार घटनास्‍थळाचा कसून पंचनामा करण्‍यात आला. यावेळी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, कणकवली पोलीस ठाण्‍याच्‍या पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पवन कांबळे, महेश शेडगे, हवालदार मंगेश बावदाणे, मिलिंद देसाई, कॉन्‍सटेबल सागर जाधव, पांडूरंग कलंतरे आदी उपस्‍थित होते.

अन् संशयिताची कबुली

पोलिसी तपासात सुशांत व अमर यांच्‍यात गुरुवारी रात्रीच्‍या सुमारास अनेक 'कॉल कॉन्‍टॅक्‍ट' झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍यानुसार संशयाची सुई अमरच्‍या दिशेने गेली. पोलिसांनी अमर याला ताब्‍यात घेऊन चौकशी केली. अखेर चौकशीत अमर याने सुशांत यांच्‍यावर गोळी मारल्‍याचे कबुल केले.

दोघेही शिकारीसाठी गेले होते

सुशांत आणि अमर हे दोघे शिकारीसाठी मुडेश्‍‍वर मैदान परिसरात गेले होते. त्‍याचदरम्‍याने काही कारणास्तव अमर याने सुशांत यांच्‍यावर गोळी मारली. मात्र, नेमक्‍या कोणत्‍या कारणास्तव अमर याने गोळी मारली, हे अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. अमर याच्‍या ताब्‍यातील बंदुक नेमकी कोणत्‍या प्रकारातील होती, याचा शोध घेण्‍यासाठी सुशांत यांचा मृतदेह कोल्‍हापूर येथील सीपीआर रुग्‍णालयात विच्‍छेदनासाठी पाठविण्‍यात आला आहे.

तत्पूर्वी सुशांत यांचा मृतदेह विच्‍छेदनासाठी कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात आणण्‍यात आला होता. त्‍यावेळी कणकवली शहर, परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळींनी उपजिल्‍हा रुग्‍णालयात धाव घेतली होती. सुशांत यांच्‍या खूनाच्‍या वृत्ताने सर्वच शोकाकूल झाले होते. तत्‍पूर्वी माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्‍यक्ष संदेश पारकर आदींनीही घटनास्‍थळी धाव घेतली होती.