युवतीचा मृत्यू हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे

डॉक्टरांसह 50 - 60 जणांवर गुन्हे दाखल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 15, 2025 18:07 PM
views 863  views

कणकवली : माने नजीकच्या गाठीवरील शस्त्रक्रिया कणकवली शहरातील नागवेकर हॉस्पिटल येथे झाल्यानंतर कस्तुरी पाताडे हिचा पुढे कोल्हापूर येथील रुग्णालयात झालेला मृत्यू व त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी नागवेकर हॉस्पिटलची केलेली तोडफोड याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी व त्यानुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डॉ. अनंत नागवेकर यांच्या फिर्यादीनुसार 50 ते 60 जणांवर तर चंद्रकांत आकाराम पाताडे‌ यांच्या फिर्यादीनुसार डॉ. अनंत नागवेकर व त्यांचा मुलगा डॉ. मयूर नागवेकर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


चंद्रकांत पाताडे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलीला मानेनजीक गाठ आली होती. त्यासाठी पाताडे कुटुंबीय तिला घेऊन नागवेकर हॉस्पिटल येथे गेले. तेथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वा. सुमारास तिच्यावर गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर कस्तुरी हिची तब्येत खालावत गेली. डॉ. नागवेकर यांच्या सल्ल्यानुसार पाताडे कुटुंबीयांनी कस्तुरी हिला कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असताना कस्तुरी हिचा मृत्यू झाला. डॉ. नागवेकर, मयूर नागवेकर यांनी गाठीची परिपूर्ण तपासणी न करता, कोणतीही काळजी न घेता शस्त्रक्रिया केली. परिणामी कस्तुरीचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 


डॉ. अनंत नागवेकर यांच्या फिर्यादीनुसार, 50 ते 60 जणांचा जमाव कस्तुरीचा मृतदेह घेऊन रुग्णालयात आला. यामध्ये पुरुष व महिलांचाही समावेश होता. जमावाने रुग्णालयात घुसून आरडाओरड करतानाच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यावेळी तेथे दाखल डॉ. नागवेकर यांची पत्नी व सून यांनाही जमावाने हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच रुग्णालयातील बेंचेस, काचा, फॅन, वायर आदींची तोडफोड केली.यामध्ये 15 लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पंधरा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.