
कणकवली : कणकवली रेल्वे स्थानक येथे संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्या प्रकरणी सुनील बाबू ताजपारिया (३९, सांताक्रुज - मुंबई) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) हवालदार हृदयनाथ शिंदे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली.
फिर्यादीनुसार, सुनील मंगळवारी रात्री ८ वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कणकवली रेल्वे स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे होता. सुनील सातत्याने प्लॅटफॉर्मवर फिरत होता. सकाळच्या सुमारास रेल्वे पोलीस हृदयनाथ शिंदे यांनी चौकशी केली असता सुनील याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची उत्तरे विसंगत असल्याने अखेर हृदयनाथ यांनी सुनील याला कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले.













