
कणकवली : कणकवली शहरातील टेंबवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी सायंकाळी छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण २७हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार ज्ञानेश्वर तवटे यांना कणकवली, टेंबवाडी येथील नमो साईनाथाय पान शॉप टपरीमध्ये कल्याण मटका जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार किरण देसाई व ज्ञानेश्वर तवटे यांनी पंचांना सोबत घेऊन छापा टाकला.
सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास येथील सर्व्हिस रोडलगत असलेल्या नमो साईनाथाय पान शॉप टपरीमध्ये एक व्यक्ती हातात पावती बुक घेऊन काही आकडे लिहिताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव पंकज दिपक बागवे (वय २९, रा. टेंबवाडी, कणकवली ) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील पावती बुकाची तपासणी केली असता त्यामध्ये कल्याण मटका जुगाराचे आकडे व त्यासमोरील रकमा लिहिलेल्या आढळून आल्या.
पोलिसांनी केलेल्या झडतीत त्याच्याकडून कल्याण मटका जुगाराच्या नोंदी असलेले पावती पुस्तक तसेच इतर साहित्य व १८ हजार १० रुपये रोख रक्कम तसेच ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान पंकज बागवे याने आपण कल्याण मटका जुगाराचे आकडे स्वीकारून हा जुगार दादा घेवारी (रा. कणकवली) याच्यासाठी चालवत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पंकज दिपक बागवे (वय २९, रा. टेंबवाडी, कणकवली) आणि दादा घेवारी (रा. कणकवली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.













