LIVE UPDATES

मुलींच्‍या छेडछाडप्रकरणी 'त्‍या सलून व्यवसायीक दाम्‍पत्‍यावरही गुन्‍हा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 19, 2026 20:09 PM
views 47  views

कणकवली : अल्‍पवयीन मुलींची दोन परप्रांतीय तरुणांनी छेड काढल्‍याप्रकरणी त्‍या तरुणांवर गुन्‍हा दाखल असतानाच हे तरूण जेथे काम करतात त्‍या सलून व्यवसायिक दाम्‍पत्‍यावरही अदखलपात्र गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. त्‍या तरुणांनी मुलींची छेड काढली, याबाबत विचारणा करण्‍यासाठी गेलेल्‍या नागरिकांना सलूनचे मालक पूनम महेश मिठबांवकर व त्‍यांचे पती महेश मिठबांवकर यांनी शिविगाळ करत ठार मारण्‍याची धमकी दिल्याचे भारती संतोष निकम व गौरव हर्णे (दोघेही रा. कणकवली – तेलीआळी) यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

दोन परप्रांतीय तरूणांनी अल्‍पवयीन मुलींची छेड काढल्‍याची घटना कणकवली शहरात चार दिवसांपूर्वी घडली होती. यावेळी काही नागरिकांनी त्‍या तरुणांना चोपही दिला होता. एकीकडे त्‍या तरुणांवर 'पोक्‍सो'अंतर्गत गुन्‍हा दाखल झाला. तर तरुण काम करत असलेल्‍या सलूनच्‍या मालकांच्‍या फिर्यादीनुसार तरुणांना मारहाण केल्‍याप्रकरणी काही जणांविरोधात गुन्‍हा दाखल झाला. यानंतर संतप्‍त कणकवलीकर नागरिकांनी पोलीस ठाण्‍यावर मोर्चा काढून सलून मालकावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी केली होती. त्‍यानुसार भारती निकम व गौरव हर्णे यांच्‍या तक्रारीनुसार हा अदखलपात्र गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

भारती निकम यांच्‍या तक्रारीनुसार, परप्रांतीय तरुणांनी मुलींची छेड काढल्‍याबाबत आम्ही विचारणा करण्‍यासाठी गेलो असता पूनम मिठबांवकर यांनी 'इथे थांबायचे नाही. येथून निघून जा.', असे म्‍हणत शिविगाळ केली. तसेचा घडला प्रकार कुणाला सांगितल्‍यास ठार मारण्‍याची धमकी दिली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. गौरव हर्णे यांच्‍या तक्रारीनुसार, गौरव व मिथून ठाणेकर व‌ अन्य काही घडल्‍या प्रकाराविषयी विचारणा करण्‍यासाठी गेले असता पूनम व महेश अंगावर धावून आले. दोघांनीही गौरव व मिथून यांची कॉलर पकडून शिविगाळ करत ठार मारण्‍याची धमकी दिल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.