LIVE UPDATES

महामार्ग ओलांडणार्‍या दुचाकीला बसची धडक

दुचाकीस्‍वार गंभीर जखमी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 21, 2026 19:46 PM
views 369  views

कणकवली : कणकवली येथून कणकवली – वागदे गावांना जोडणार्‍या केटी बंधारा रस्‍त्‍यावरून दुचाकीने जात पुढे महामार्ग ओलांडणार्‍या दुचाकीला मालवणहून कणकवलीच्‍या दिशेने येणार्‍या एसटी बसची धडक बसली. वागदे येथील नाईक पेट्रोलशल पंपासमोर गुरुवारी दुपारी ३ वा. सुमारास झालेल्‍या या अपघातात दुचाकीस्‍वार कृष्‍णा सुरेश साटम (३२, रा. निरोम, ता. मालवण) हे गंभीर जखमी झाले. त्‍यांना उपचारासाठी कणकवलीतील खासगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

घटना अशी, कृष्‍णा हे पोलिसांत होमगार्ड म्‍हणून कार्यरत आहेत. ते दुचाकीने कणकवलीहून वागदे येथे जात होते. त्‍यासाठी ते कणकवली – वागदे जोडणार्‍या केटी बंधारा रस्‍त्‍यावरून प्रवास करत होते. हाच रस्‍ता पुढे महामार्गावरील नाईक पेट्रोल पंपासमोर महामार्गाला मिळतो. कृष्‍णा हे पेट्रोल भरण्‍यासाठी महामार्ग ओलांडत होते. त्‍याचवेळी कणकवलीच्‍या दिशेने येत असलेल्‍या कणकवली – मालवण बसची दुचाकीला धडक बसली. अपघातात कृष्णा रस्‍त्यावर फेकले गेले. त्‍यांच्‍या डोक्‍यालाा गंभीर दुखापत झाली.

अपघात घडताच क्षणी परिसरातील नागरिकांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, कॉन्‍सटेबल प्रणाली जाधव आदी घटनास्‍थळी दाखल झाले. कृष्णा यांना कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्‍याने प्राथामिक उपचार करून त्‍यांना अधिक उपचारासाठी कणकवलीतीच खासगी रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. अपघाताची कणकवली पोलीस ठाण्‍यात नोंद करण्‍याची प्रक्रीया अद्‍याप सुरु आहे.