कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा खून ?

जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 27, 2026 12:03 PM
views 1126  views

कणकवली : बांधकाम व्यवसायीक सुशांत दळवी यांचा खूनच झाल्याचे पोलीस तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. सुशांत यांच्या कपाळाला बंदुकीची गोळी लागली असून ही गोळी अगदी जवळून मारली गेली असल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. मात्र सुशांत यांचे मारेकरी कोण, हे अद्यापही कळू शकलेले नाही. या खून प्रकरणामुळे कणकवलीच नव्हे तर सबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कणकवली येथील प्रतिथयश बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह कणकवली शहरातील कणकवली - कनेडी मार्गापासून काही अंतरावर असलेल्या गणेश नगर येथील मोहन मळा या जंगलमय भागात आढळून आला. या भागामध्ये एक मांगर असून त्यामध्ये काही कामगार राहतात त्यातीलच एका कामगाराला हा मृतदेह दिसून आला. 

घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता सुशांत यांच्या कपाळाला बंदुकीची गोळी लागली दिसून आली. विशेष म्हणजे सुशांत यांचा मृतदेह तेथील पायवाटेपासून जवळपास 40 फूट अंतरापर्यंत ओढत जंगलमय भागात फेकल्याचे दिसून आले. अर्थातच ही आत्महत्या नसून घातपातच असल्याची बाब स्पष्ट झाली. मात्र हा खून नक्की गणेश नगर येथेच करण्यात आला आहे की अन्यत्र खून करून मृतदेह येते आणून फेकण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

सुशांत यांच्या खिशात मोबाईल आढळला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक दाखल झाले.  ठसेतज्ञ व श्वानपतथही आले असून घटनास्थळाचा कसून पंचनामा सध्या सुरू आहे. 

सुशांत दळवी हे प्रतीथयश बांधकाम व्यावसायिक होते. साहजिकच त्यांचा खून कोणी केला व खुनाचे कारण काय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. अर्थातच पोलीस तपास सुरू असून सर्व बाबी उलगडतील, असा विश्वास पोलीस व्यक्त करत आहेत.